(रत्नागिरी /प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात सुरू होते. १७ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांकडून गणनापत्रे भरून घेत होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान रत्नागिरी शहरातील मतदार याद्यांमधील विसंगती समोर आल्याने प्रशासनाच्या नोंदणी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रत्नागिरी शहरातील काही मतदारांची नावे २००२च्या मतदार यादीत असतानाही सध्याच्या यादीत त्यांचा शोध घेणे कठीण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे, तर काहींच्या नावांचा समावेश चक्क वेगळ्या प्रभागात झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. मतदार याद्या दरवर्षी अद्ययावत करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबविली जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांचा आधार घेत राज्यातील विविध निवडणुकांसाठी आवश्यकतेनुसार याद्या तयार केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे विभाजन करताना आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असते. मात्र, काही ठिकाणी याद्यांच्या विभाजनादरम्यान विसंगती निर्माण झाल्याचे आता एसआयआरच्या प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे.
मतदार यादीत नावच आढळून न आल्यास संबंधित नागरिकाला पुन्हा नवमतदार म्हणून अर्ज करण्याची वेळ येणार आहे. अशा मतदारांना २४ ऑगस्टनंतर फॉर्म क्रमांक ६ भरावा लागणार असून, आवश्यक पुराव्यांची कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यामुळे वर्षानुवर्षे मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांनाच पुन्हा नोंदणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांमध्ये प्रत्येक मतदाराने आपले नाव, पत्ता आणि प्रभागाची नोंद तपासणे आवश्यक असते. मात्र, या बाबत नागरिकांमध्ये अद्यापही अपेक्षित जागरूकता दिसून येत नाही. परिणामी, मतदानाच्या दिवशी नाव सापडत नसल्याने होणारी धावपळ टाळण्यासाठी मतदारांनी निवडणुकीपूर्वीच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे ठरणार आहे.
एसआयआरच्या निमित्ताने मतदार याद्यांमधील विसंगती उघड झाल्याने आता संबंधित यंत्रणेने या त्रुटींची गांभीर्याने दखल घेऊन मतदारांची नावे, पत्ते आणि प्रभागनिहाय नोंदी अचूक करण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण मतदार यादीतील एका चुकीचा थेट परिणाम नागरिकाच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारावर होऊ शकतो.

