(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील रस्त्यांत भले मोठे खड्डे पडले आहेत .या मार्गावरुन जाणा-या वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे.
कळझोंडी क्रमांक १ ते कळझोंडी क्रमांक २ या मार्गा वरून सातत्याने एस.टी. वाहतूक व इतर रिक्षा, दुचाकी, ट्रक यांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, कर्मचारी, उद्योजक यांची दैनंदिन रेलचेल सुरू असते. सदर रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक व मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे.
कळझोंडी क्रमांक २ ते तिसंग मार्ग या रस्त्यावर प्रचंड खड्डे व साईट पट्टी पूर्णपणे बाद झाल्याने या भागातील छोट्या छोट्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर कळझोंडी तिसंग ते धरण मार्गे हा रस्ता ही नदीच्या व धरणाच्या पाण्याने बराचसा खचला असून या रस्त्यावर भेगा गेल्या आहेत. धरणाच्या बाजूला प्रचंड पाण्याचा साठा असून एखादे वाहन घसरले तर पाण्यातच मोठा अपघात होऊ शकतो.या रस्त्याला संरक्षण भिंत ही नाही. तसेच गावात बी.एस.एन.एल.टावर असून या टावरमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने या भागातील नागरिकांना, कर्मचारीवर्गाला मोठ्या प्रमाणात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.
कळझोंडी गावात धरण आहे.पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.तरीही मुबलक पाणी पुरवठा होत नाही.धरणाची उंची वाढवण्यात आली. काम पूर्ण झाले आहे.तरी नवीन पाईप लाईन का सुरू करण्यात आली नाही.कळझोंडी गावातून जाणारी दुपारी १ वाजताची एस.टी.बस.अनियमित आहे. अचानक कधीही ही फेरी बंद करण्यात येते व प्रवाशांना अचानक यातना भोगायला लागतात. सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी एस.टी.बस.वर्षभर अचानक रद्द करण्यात आली आहे.याबाबत ग्रामपंचायत कळझोंडी यांच्यावतीने ग्रामसभेत विविध ठराव, पत्रव्यवहार,अर्ज विनंत्या संबंधित खात्यांना करण्यात आल्या असून ही संबंधित खात्यांकडून कोणती ही हालचाल केली नाही.
अखेर ग्रामपंचायतीने हात टेकले असून आता शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार दिनांक ९डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कळझोंडी फाटा क्रमांक २ (निवडी जयगड रोड) कळझोंडी ग्रामस्थांचे “धरणे जन आंदोलन” उभे केले जाणार आहे. याबाबत कळझोंडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामसेवक अमोल केदारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, महिला यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
यासाठी भव्य दिव्य जनआंदोलन उभारणीच्या कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावात आतापासूनच जनजागृती करण्यासाठी ग्रामस्थ महादेव आग्रे, संदीप पवार पांडुरंग सनगरे, के.आर. पवार, आदींच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारीला लागले असून या धरणे जन आंदोलनाची निवेदने मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी ,मान. उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी. त्यांना सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती श्री महादेव आग्रे यांनी आमच्या प्रतिनिधींशी दिली आहे.

