( लांजा / वार्ताहर )
तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथे मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीत मयूर प्रकाश जाधव (वय २८, रा. आरगाव खालील वाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) ही घटना उघडकीस आली. लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव याच्या कमरेखालील शरीराची संवेदना कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी तो घरातील कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर वाडीतील नागरिक आणि नातेवाइकांकडून त्याचा शोध सुरू होता. याचदरम्यान, मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीतील पाण्यावर मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे लांजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दुपारी २.१० वाजता तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी विजय तुकाराम जाधव (वय ३८, रा. आरगाव खालील वाडी, ता. लांजा) यांनी दिलेल्या खबरीवरून लांजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार शेलार करीत आहेत. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


