(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथे आयोजित करण्यात आलेला जनता दरबार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या जनता दरबाराला जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून त्यांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कृषी तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित अनेक प्रश्नांवर नागरिकांनी निवेदने आणि अर्ज सादर केले. यावेळी तब्बल ५२ अर्जदारांनी आपली कैफियत मांडत विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. जनतेच्या समस्या वेळेत मार्गी लागल्या पाहिजेत. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.”
जनता दरबारादरम्यान अनेक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी राजापूर प्रांताधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जनता दरबारात प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाचा सखोल पाठपुरावा करून त्यावरील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असल्याचे सांगितले. लोकाभिमुख प्रशासन ही काळाची गरज असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जनता दरबारामुळे नागरिकांना थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. लांजा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

