(रत्नागिरी)
लांजा तालुक्यात एका नात्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी साहिल दत्ताराम मसणे (वय 21, रा. पन्हळे मसणेवाडी, लांजा) याला 20 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. ही घटना सन 2022 मध्ये घडली होती.
साहिलने घराशेजारीच राहणाऱ्या नात्यातील मुलीला “जेवण बनवण्यासाठी घरी ये” असे म्हणत 4 ते 5 वेळा बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. आरोपीने पीडितेला धमकावून ठेवले की, कोणाला काही सांगितल्यास ठार मारेल. या अत्याचारामुळे पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिली.
पीडितेच्या नातेवाईकांनी हे लक्षात घेतल्यावर लांजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला गेला आणि तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले गेले.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या सहाय्यक वकिल ॲड. मेघना नलावडे यांनी 11 साक्षीदार तपासत युक्तिवाद केला, जो जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी मान्य केला. न्यायालयाने साहिलला सक्तमजुरी: 20 वर्ष, दंड: 11,500 रुपये (यापैकी 7,000 रुपये पीडितेला देण्याचे आदेश), कलमानुसार शिक्षा: 2 हजार दंडासह 3 वर्ष, 500 रुपये दंडासह 1 वर्ष अशी शिक्षा सुनावली:
गुन्हा घडत असताना आरोपी 21 वर्षांचा असल्यामुळे त्याच्या वकिलांनी त्याला अपराधी परिविक्षा अधिनियम, 1958 अंतर्गत सवलत मिळावी अशी मागणी केली होती. परंतु गुन्ह्याची गंभीरता आणि घृणास्पद स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने ही विनंती नाकारली.

