(जैतापूर / वार्ताहर)
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बंद घरे फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत एकापाठोपाठ घडलेल्या घरफोडीच्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांची उकल केली. या तिन्ही प्रकरणांतील आरोपींना स्वतंत्र कारवाईत अटक करून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत घरफोडीच्या तीन घटना घडल्या होत्या. भालावली, वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास महादेव भोसले यांच्या बंद घराची कडी काढून अज्ञात चोरट्यांनी कपाटातून १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चपटी चैन चोरून नेली होती.
यानंतर नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना त्यांच्या भाड्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याची गोफ चैन, अंगठी, चांदीचे दागिने तसेच ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील १ लाख रुपये रोख असा सुमारे २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
तिसऱ्या घटनेत नाणार भटवाडी येथील सेवानिवृत्त सिस्टर लता वासुदेव साईम या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडले. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील चांदीची पूजेची भांडी आणि साहित्य चोरून नेले होते.
या सलग घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन नाटे पोलिसांनी तिन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी तपासाच्या वेगवेगळ्या दिशांनी हालचाली सुरू केल्या. अखेर पोलिसांच्या चिकाटीच्या तपासातून तिन्ही स्वतंत्र गुन्ह्यांतील आरोपींचा माग काढण्यात यश आले.
नाणार येथील घरफोडीप्रकरणी बीड जिल्ह्यातील कासारी (ता. आष्टी) येथील सराईत चोरटे संजय उर्फ मोहन निकाजा भोसले आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले यांना पोलिसांनी जेरबंद केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने करीत आहेत.
दरम्यान, उर्वरित दोन घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींचाही पोलिसांनी माग काढून त्यांना गजाआड केले आहे. तिन्ही प्रकरणांतील आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत तिन्ही क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली.
घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड करून नागरिकांचा कष्टाचा ऐवज परत मिळवून दिल्याबद्दल नाटे सागरी पोलीस पथकाचे राजापूर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून विशेष अभिनंदन होत आहे.


