(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या अनुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अमर मोरे, रामदास पाटील, स्वप्निल घाटगे, अर्शद मुल्ला आणि जाधव यांनी मदतकार्य सुरू केले. यावेळी घाटातून प्रवास करणारे नागरिक तसेच पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारासाठी भाजीपाला घेऊन निघालेल्या भाजी विक्रेत्यांनीही पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून दरड हटविण्याचे काम केले.
सलग जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील मोठे दगड व माती बाजूला करण्यात आली आणि अखेर घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
अनुस्कुरा घाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. दरवर्षी अशा घटना घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याची तीव्र नाराजी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. घाट परिसरातील धोकादायक उतारांची नियमित तपासणी, रस्त्यालगत वाढलेली झाडे व झुडपे हटविणे, तुंबलेली गटारे आणि पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे, तसेच संभाव्य दरडप्रवण ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे एवढी मोठी दरड कोसळून वाहतूक बंद झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याचे दिसून आले नाही. उलट, संपूर्ण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी राजापूर पोलिसांवरच आली. पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने रात्रभर मदतकार्य राबवत वाहतूक पूर्ववत केली.
अनुस्कुरा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या घाटातील सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच आवश्यक देखभाल, दरड प्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

