(जैतापूर / वार्ताहर)
पवित्र रमजान महिन्यानिमित्त जैतापूर येथील जैतापूर जामा मशीद जमातून मुस्लिम कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वधर्मीयांनी एकत्र येत भाईचारा आणि एकोप्याचा संदेश दिला.
रमजान हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात रोजे ठेवून आत्मसंयम, संयमित जीवन, दानधर्म आणि समाजातील बंधुभाव वाढवण्यावर भर दिला जातो. दिवसभराचा रोजा संपल्यानंतर सायंकाळी सामूहिकरित्या करण्यात येणाऱ्या इफ्तारला विशेष धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे. या निमित्ताने समाजातील सर्व घटक एकत्र येऊन मैत्री, सद्भावना आणि परस्पर आदराची भावना दृढ करतात.
या इफ्तार कार्यक्रमाला सागरी पोलीस ठाणे नाटे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी पाटील, कुसाळे आदी उपस्थित होते. तसेच जैतापूरचे माजी सरपंच व जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडवीकर, पत्रकार राजन लाड, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र प्रसाद राऊत, वेताळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तन्मय मांजरेकर, हर्षद मांजरेकर, राकेश दांडेकर, सुबोध मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात जमातून मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष जलाल काझी यांच्यासह सरफराज गुलाम हुसेन काजी, जब्बार काझी, युसुफ काझी, नासिर काझी, सलीम काझी, खलील काझी, सिद्दीक बावानी, जावेद काझी, सरफराज शरफुद्दीन काजी, गुलाम मुखरी आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्परांशी संवाद साधला आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ केला.
जैतापूर हे गाव विविध सण-उत्सव एकत्र साजरे करण्यासाठी ओळखले जाते. गणेशोत्सव, रमजान, ईद तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व धर्मीय नागरिक एकत्र सहभागी होत सर्वधर्मसमभाव, भाईचारा आणि सामाजिक ऐक्याची परंपरा सातत्याने जोपासत असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

