(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठेसह परिसरातील सुमारे ४० गावांतील वीज ग्राहकांना वीजबिल, मीटर, वीजपुरवठा तसेच महावितरणशी संबंधित विविध तक्रारींसाठी यापुढे विद्युत कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. पाचल बाजारपेठेतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीखाली आठवड्यातून एक दिवस महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. आठवडा बाजाराच्या दिवशी म्हणजेच दर बुधवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाचल बाजारपेठेतील तसेच परिसरातील वीज ग्राहकांना महावितरणच्या विविध कामांसाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. वीजबिलातील त्रुटी, मीटरसंदर्भातील अडचणी, वीजपुरवठ्यातील समस्या, नवीन वीज जोडणी, बिल दुरुस्ती अथवा अन्य तक्रारी नोंदवण्यासाठी ग्राहकांना पाचल बाजारपेठेपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या महावितरणच्या कार्यालयात जावे लागत होते. ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यापाऱ्यांना यामुळे वेळ आणि आर्थिक खर्चाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता.
ही गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पाचल आणि व्यापारी संघटना पाचल यांच्या वतीने महावितरणच्या पाचल तसेच राजापूर कार्यालयाशी वारंवार संपर्क साधण्यात आला होता. वीज ग्राहकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन पाचल बाजारपेठेतच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्राहकांची गैरसोय कायम होती.
अखेर व्यापारी संघटना पाचलच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य स्थानिक आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना लेखी निवेदन दिले. नागरिक आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाची आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पाचलमध्येच वीज ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महावितरणचे अधिकारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार आता दर बुधवारी, पाचलचा आठवडा बाजार भरतो त्या दिवशी, महावितरणचे अधिकारी पाचल ग्रामपंचायत इमारतीखालील कार्यालयात बसणार आहेत. या ठिकाणी वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी, सूचना तसेच वीजबिल आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. संबंधित तक्रारींची नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.
दरम्यान, पाचल ग्रामपंचायतीनेही या उपक्रमासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परिसरातील सुमारे ४० गावांतील वीज ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने आपल्या मालकीच्या इमारतीखालील कार्यालय महावितरणला कोणतेही भाडे न आकारता मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना बाजारपेठेतच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे.
आठवडा बाजाराच्या दिवशीच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने पाचलसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. बाजाराच्या निमित्ताने पाचलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपली वीजविषयक तक्रार त्याच दिवशी नोंदवता येणार असून, त्यासाठी स्वतंत्रपणे महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः दूरवरच्या गावांमधून येणाऱ्या नागरिकांची वेळ, प्रवासाचा खर्च आणि होणारी धावपळ यामुळे कमी होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वीज ग्राहकांची ही गैरसोय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने दूर झाल्याने पाचल परिसरातील वीज ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाचल येथे नियमितपणे उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्यावी आणि शक्य तितक्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

