(राजापूर / रत्नागिरी)
सामाईक जमीन आणि घराच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादातून भावजयवर कोयतीने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथे घडली. या हल्ल्यात सुहासिनी सुरेश तावडे (६०) यांच्या पाठीवर आणि उजव्या खांद्यावर दुखापत झाली असून, याप्रकरणी त्यांच्या दीराविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहासिनी तावडे आणि त्यांचे दीर नामदेव धोंडू तावडे (६१) यांच्यात सामाईक जमीन तसेच घरावरून पूर्वीपासून वाद आहेत. ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास सुहासिनी तावडे आणि त्यांचे पती सुरेश तावडे हे ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथून उपचार घेऊन घरी परतले. त्यावेळी नामदेव तावडे हे घराशेजारील सामाईक जमिनीतील बागेची साफसफाई करत होते. यावेळी सुहासिनी तावडे यांनी नामदेव यांना, “तुम्ही खालच्या जमिनीतील खाता ते खा, आम्हाला हे राहू द्या,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या बोलण्याचा राग आल्याने नामदेव तावडे हे त्यांच्या दिशेने आले आणि “काय बोलतीस, बाहेर या; तुमच्या दोघांचे तुकडे पाडतो,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर नामदेव तावडे यांनी सोबत असलेल्या पिशवीतून कोयती काढून सुहासिनी तावडे यांच्या अंगावर धाव घेतली. कोयतीचा वार करण्याचा प्रयत्न होत असताना सुहासिनी यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली वाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी कोयतीचा वार त्यांच्या पाठीवर उजव्या खांद्याच्या परिसरात लागला. यात त्या जखमी झाल्या.
या घटनेनंतर सुहासिनी तावडे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून नामदेव धोंडू तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

