(जाकादेवी / संतोष पवार)
राजापूर तालुक्यातील कशेळी केंद्राची शिक्षण परिषद शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार कशेळी प्राथमिक शाळा क्रमांक ५ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. केंद्र समन्वयक सौ. समिक्षा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध नियोजित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेत केंद्र समन्वयक सौ. समिक्षा पवार, श्री. प्रतिक मोरे, श्री. दिनेश गावित, श्री. मनोज मिरगुले, श्री. कमलेश महाडिक, श्री. मिलिंद नार्वेकर आणि सौ. नेहा पवार यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध शैक्षणिक विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी करावयाचे नियोजन, प्रभावी अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नवोदय विद्यालय, आरएसएम तसेच इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्र समन्वयक सौ. समिक्षा पवार आणि केंद्रातील ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ते शैक्षणिक भेटवस्तू देऊन प्रेरणादायी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्मिता दळवी, स्वरा भोसले, लोकेश महाले, स्वरा आडीवरे, अस्मी राडये, संस्कृती जाधव, स्वानंदी जायदे, अनुज शिंदे आदी विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
तसेच केंद्रातील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. वृषाली विश्वासराव यांचा केंद्रातर्फे केंद्र समन्वयक सौ. समिक्षा संतोष पवार यांच्या हस्ते शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.
या शिक्षण परिषदेला केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री. संतोष रूमडे, श्री. सुनील जायदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिकेत यादव, आडिवरे हायस्कूलच्या शिक्षक प्रतिनिधी सौ. लांजेकर, कशेळी हायस्कूलचे शिक्षक प्रतिनिधी श्री. कांबळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक सौ. समिक्षा पवार यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील जायदे यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले, तर श्री. मिलिंद नार्वेकर यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी झालेले मार्गदर्शन यामुळे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

