( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कुणबी सेवा संघ, दापोलीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात निधन पावलेले संघाचे सभासद, त्यांचे नातेवाईक तसेच संस्थेचे हितचिंतक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक व संस्थात्मक योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
संघाच्या कार्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने अहवाल वर्षात कृष्णा मोरे, वसंत गायकवाड आणि गोविंद कोळंबे यांनी संस्थेचे आजीव सभासदत्व स्वीकारले. या तिन्ही नवीन आजीव सभासदांचा संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थेच्या कार्याशी अधिकाधिक व्यक्तींनी जोडले जावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त संघाचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी सभेसमोर वाचून दाखविले. सभासदांनी त्यास मान्यता दिली. त्यानंतर सभेच्या विषयसूचीप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक सभेसमोर सादर करण्यात आले. त्यावर चर्चा करून अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ चे संस्थेचे लेखा परिक्षण हिशोबपत्रक सभेसमोर मांडण्यात आले व त्यास सभेने मंजुरी दिली. अहवाल वर्षात कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा तसेच संस्थेच्या विविध कामकाजाचा आढावा अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांनी सभेसमोर घेतला. संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याची माहिती देताना भविष्यातही संस्थेच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सभासदांनी संस्थेच्या कामकाजासंदर्भात तसेच विविध विषयांबाबत काही प्रश्न व सूचना उपस्थित केल्या. प्रा. प्रभाकर शिंदे यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले. अध्यक्षांनी सभेचे अत्यंत संयोजनपूर्वक व प्रभावीपणे संचालन केले. संस्थेच्या पुढील वाटचालीत सभासदांचा सक्रिय सहभाग, सहकार्य आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सभेच्या शेवटी संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. सभेस संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणबी सेवा संघाच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याला पुढील काळातही सभासदांचे सहकार्य आणि समाजाचा सक्रिय सहभाग मिळत राहील, असा विश्वास या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आला.


