(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक, जलद आणि सुलभ ऑनलाइन देयक सेवा उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी यांचा स्वामी समर्थ सेवा मंडळ संगमेश्वर पंचक्रोशीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सेवेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संगमेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात जोशी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्वामी समर्थांची फोटो फ्रेम देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक मितेश केणी आणि पोलीस उपनिरीक्षक महाजन प्रमुख उपस्थित होते. स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मंडळाच्या कार्यकारिणीतील दिलीप पेंढारी (तालुका पंचायत समिती मा. सभापती), उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील गेल्ये, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दोरकडे, जनार्दन शिरगावकर, माजी सरपंच सीताराम पड्ये, अशोक पड्ये, अनंत मांडवकर, मंगेश मांडवकर, प्रकाश घडशी आणि संतोष मुडेकर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी सभापती दिलीप पेंढारी म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा व परवानग्या घरबसल्या, पारदर्शक आणि दप्तरदीरंगाईशिवाय उपलब्ध करून देणे हा आहे. सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागू नयेत, तसेच नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, यासाठी या पोर्टलचा मोठा फायदा होत आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात किशोर जोशी यांनी या उद्देशाची प्रभावी अंमलबजावणी करत पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना तत्परतेने सेवा दिली आहे. त्यांच्या या कार्याची पोलीस प्रशासनाने यापूर्वीही दखल घेऊन सन्मानपत्र देऊन गौरव केला होता. आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी पोलीस दलाचा गौरव राज्यभर वाढवला आहे, असे पेंढारी यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनील गेल्ये यांनी सांगितले की, समाजाप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वामी समर्थ सेवा मंडळ संगमेश्वर पंचक्रोशीच्या वतीने विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सन्मान करणे हेही मंडळाचे कर्तव्य मानले जाते. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा योग्य आणि प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांची कामे जलदगतीने कशी पूर्ण करता येतात, याचे उदाहरण किशोर जोशी यांनी आपल्या कार्यातून घालून दिले आहे. पोलीस ठाण्यात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आपुलकीने मार्गदर्शन करून सेवा देण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांना राज्यस्तरीय हा बहुमान मिळाला असल्याचे गेल्ये यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दोरकडे यांनी सांगितले की, सरकारी किंवा पोलीस ठाण्यातील कामांसाठी नागरिकांच्या मनात अनेकदा भीती किंवा संकोच असतो. मात्र किशोर जोशी यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरील डिजिटल सेवा सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवल्याने प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या या यशाचा संपूर्ण संगमेश्वर पंचक्रोशीला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
जनार्दन शिरगावकर यांनीही किशोर जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले. शासनाचे उपक्रम केवळ कागदावर न राहता ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी लोकसेवा आहे. किशोर जोशी यांनी प्रामाणिकपणे आणि सातत्याने मेहनत घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर नेले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असे शिरगावकर यांनी सांगितले.
या छोटेखानी सत्कार समारंभाला ग्रामस्थ तसेच कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील उपस्थित होते.


