(संगमेश्वर / अमृतराव जाधव)
गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता वाढत असतानाच संगमेश्वर शहरातील बाजारपेठ सजावटीच्या साहित्यांनी बहरून गेली आहे. विविधरंगी माळा, हार, मखर, झिरमळ्या, विद्युत दिवे आणि कृत्रिम फुलांच्या तोरणांनी दुकाने उजळली असून ग्राहकांची मोठी गर्दी बाजारपेठेत उसळली आहे.
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत, विघ्नहर्ता गणरायाचे २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून बाजारपेठेत चैतन्य फुलले आहे. विशेषतः मागील चार-पाच दिवसांत खरेदीदारांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सायंकाळी पाचनंतर बाजारपेठेतून ग्राहकांनी सजावटीच्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. गणरायाची आरास आकर्षक व देखणी व्हावी यासाठी शहरातील विविध भागांत व्यापाऱ्यांनी स्टॉल उभारले असून तेथील वस्तूंची मोठी मागणी होत आहे.
बाजारपेठेत विविध आकारांच्या व रंगीबेरंगी विद्युत माळा, आकर्षक नक्षीकाम असलेले पूजेचे साहित्य, कृत्रिम फुलांचे हार, अगरबत्ती, धूप, रांगोळीचे रंग व छाप, वाती, उपरणे, चांदीचे मोदक, दूर्वा, कंबरपट्टा, मूषक, चंदनहार अशा वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
सजावटीच्या हारांमध्ये गुलाबी, पिवळे आणि लाल रंगाचे हार सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून त्यांची किंमत ५९ रुपयांपासून पुढे आहे. मण्यांचे हार वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. किरकोळ विक्रेते शंभर रुपयांत दोन माळा या किमतीत विक्री करत आहेत. बाप्पासाठी आकर्षक आसने ५९ ते १०० रुपयांत उपलब्ध आहेत. मोत्यांच्या व खड्यांच्या कंठ्याही विविध डिझाईन्समध्ये बाजारात दाखल झाल्या असून त्यांची किंमत १०० रुपयांपासून पुढे आहे.
गणेशोत्सव अगदी नजीक येऊन ठेपल्याने संगमेश्वर बाजारपेठेचा प्रत्येक कोपरा उत्साह, रंग आणि भक्तिभावाने उजळून निघाला आहे.

