(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावूनही संबंधित बांधकाम न हटविल्याने देवरुखमधील अजरामर कोकम सरबत कारखान्याच्या मालकिणीविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी जयंता सरदेशपांडे असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे देवरुख येथे आरोपी कल्याणी सरदेशपांडे यांच्या मालकीच्या अजरामर कोकम सरबत कारखान्यात व्यवसायाच्या उद्देशाने लोखंडी पत्र्याचे छप्पर असलेले तसेच चारही बाजूंनी लोखंडी जाळीने बंदिस्त केलेले शेड उभारण्यात आले आहे. हे बांधकाम आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतपणे करण्यात आल्याचा आरोप आहे. या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितांना नोटीसद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, नोटीस बजावूनही अद्याप हे बांधकाम हटविण्यात आले नसल्याने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी श्रद्धा अरंजय कांबळे (वय २७, रा. दत्तनगर, देवरुख) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ व ५३ चा भंग केल्याप्रकरणी कलम ५४ व ५५ अन्वये कल्याणी जयंता सरदेशपांडे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ जुलै २०२६ ते ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत देवरुख येथे हा प्रकार घडल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.


