(दापोली / वार्ताहर)
दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातील खोंडारण खालचीवाडी येथे शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून अनपेक्षितरीत्या गोळी सुटल्याने ४४ वर्षीय सचिन शांताराम शिगवण यांचा गोळी लागून मृत्यू झाला. या घटनेत सुनील पाध्ये (४८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पाध्ये हे शिकारीसाठी रानात गेले होते. यावेळी गावठी बंदुकीतून अनपेक्षितरीत्या गोळी सुटली. त्यातील छरे सचिन शिगवण यांच्या पोटात लागले. चार ते पाच छरे लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत सुनील पाध्ये हेही जखमी झाले. त्यांच्या गुडघ्यात आणि मांडीला दोन ते तीन छऱ्याच्या गोळ्या लागल्या आहेत. त्यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून अनपेक्षितरीत्या गोळी सुटल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घटनेशी संबंधित पुरावे ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, बंदुकीतून छरे नेमक्या कोणत्या परिस्थितीत सुटले, शस्त्राची हाताळणी कोणाकडून झाली आणि घटनेच्या वेळी दोघांची नेमकी स्थिती काय होती, याचा तपास दाभोळ पोलिसांकडून सुरू आहे. बंदूक तसेच घटनेच्या नेमक्या परिस्थितीबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.


