(पंढरपूर / वृत्तसंस्था)
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात नवीन विहिरीच्या खोदकामादरम्यान अचानक कठडा आणि दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे ३० फूट खोल विहिरीत काम करणाऱ्या मजुरांना या दुर्घटनेतून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. ढिगाऱ्याखाली दबून चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आंबे येथील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू होते. हे काम जवळपास पूर्ण झाला होते. पण, 50 फुट विहिरीच्या आतमध्ये 4 मजूर हे मोजमाप घेण्यासाठी सकाळी 10 च्या सुमारास उतरले होते. पण, यावेळी अचानक विहिरीचा कठडा कोसळला आणि विहिरीत काम करत असलेले सर्व मजूर मोठ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. यावेळी दोन मजूर विहिरीत उतरून शिल्लक काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक विहिरीचा कठडा कोसळला. त्याचवेळी दगड आणि मातीचा मोठा ढिगारा खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मजुरांना स्वतःचा बचाव करण्याची किंवा विहिरीबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. चौघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने चारही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे (दोघेही रा. रांजणी), तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके (दोघेही रा. अनवली) यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. एनडीआरएफची (NDRF) टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आंबे या गावात घटनास्थळी भेट देऊन रेस्क्यू कार्याची पाहणी केली. दरम्यान, गेल्या सहा तासापासून जिल्हाधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चार मजुरांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने रांजणी आणि अनवली या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे


