(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे येथून गुवाहाटीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्या विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. विमानाचे लँडिंग गिअर (चाके) आत न ओढले गेल्याने वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान पुन्हा पुणे विमानतळाकडे वळवण्यात आले. अखेर सकाळी 9:04 वाजता विमानाने सुरक्षित लँडिंग केले. विमानातील १९२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6 ई 0623 (VT-IZE) हे विमान रविवारी पुण्याहून गुवाहाटीकडे रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर लगेचच तांत्रिक बिघाड निदर्शनास आला. विमानाचे लँडिंग गिअर बाहेरच्या स्थितीतच राहिल्याने ते आत घेणे शक्य झाले नाही. वैमानिकाने तातडीने ही माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळविली. त्यानंतर पुणे विमानतळ प्राधिकरणाने एटीसी, इंडिगो आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या भारतीय हवाई दलाने (IAF) ‘पूर्ण आणीबाणी’ (Full Emergency) घोषित केली. प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्धारित आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विमानतळावर आवश्यक तयारी करण्यात आली.
लँडिंग गिअरची स्थिती प्रत्यक्ष तपासता यावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विमानाने धावपट्टीवरून कमी उंचीवरून उड्डाण केले. त्यामुळे अधिकाऱ्यांना विमानाच्या चाकांची स्थिती पाहून खात्री करता आली. त्यानंतर सकाळी 9:04 वाजता विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
विमान उतरल्यानंतर आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रियेचा भाग म्हणून तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिका विमानाजवळ दाखल झाल्या. विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने सकाळी साडेपाच वाजता जाहीर केलेली ‘पूर्ण आणीबाणी’ मागे घेतली. त्यानंतर विमानाला एअरब्रिज जोडण्यात आला आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. विमानातील १९२ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली.
दरम्यान, प्रवाशांचा गुवाहाटीपर्यंतचा प्रवास पूर्ण व्हावा यासाठी इंडिगोने बंगळुरूहून पुण्यासाठी जाणारे दुसरे विमान उपलब्ध करून दिले आहे. इंडिगोच्या प्रवक्त्यानेही पुणे-गुवाहाटी मार्गावरील 6 ई 623 (6E 623) या विमानात उड्डाणानंतर काही वेळात तांत्रिक बिघाड झाल्याने ते पुन्हा पुण्याकडे वळवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. विमान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले असून त्याची देखभाल तपासणी सुरू आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर हे विमान पुन्हा सेवेत दाखल केले जाणार असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.


