(दापोली)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे आज (शनिवारी) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे दापोली तालुक्यातील जालगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह नगर येथील मूळ गावी सुट्टीसाठी गेले होते. सुट्टी संपवून शनिवारी (३० मे) दुपारनंतर ते दापोलीकडे परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे हॉटेल बालाजीजवळ त्यांच्या इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की, भरधाव कार समोरील कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा गव्हाणे (स्टेट बँक ऑफ इंडिया येथे वरिष्ठ सहयोगी अधिकारी) आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अनिल मरकड यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची तसेच मुलगा चिन्मय यालाही दुखापत झाली असून त्यालाही उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मरकड कुटुंबीय दापोली तालुक्यातील जालगाव येथे वास्तव्यास आहेत. अपघाताची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

