(दापोली / प्रतिनिधी)
तालुक्यातील बुरोंडी चेकपोस्ट येथे डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महाळुंगे गावातील सुशांत दशरथ झिमण (वय २६) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली चार महिन्यांची झुंज अखेर शनिवारी पहाटे संपली. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महाळुंगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुरोंडी चेकपोस्ट येथे ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव डंपरने सुशांतच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. पाठ आणि मानेच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. वैद्यकीय पथकाने त्याचा जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर शनिवारी पहाटे त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली. सुशांत हा अत्यंत मेहनती, नम्र आणि कुटुंबवत्सल स्वभावाचा तरुण म्हणून परिसरात परिचित होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो मिळेल ते काम करण्यास सदैव तत्पर असे. कधी भाजी विक्रीचा व्यवसाय तर कधी वाहनचालक म्हणून काम करत तो आई-वडिलांना आर्थिक आधार देत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शेकडो नागरिक, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अनेकांनी आर्थिक मदतीबरोबरच त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली होती. मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
चार महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या कष्टाळू तरुणाच्या निधनामुळे महाळुंगे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक स्तरातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

