(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी)
घराच्या परसातील जमिनीच्या हद्दीवरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला शासकीय मोजणीनंतर पुन्हा तोंड फुटले. जमिनीच्या मोजणीत दोन्ही कुटुंबांच्या जागेबाबत हद्दीचा मुद्दा समोर आल्यानंतर झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. या घटनेत एका साक्षीदारासह एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालू-कुंभारवाडी येथे साळवी आणि देवळेकर कुटुंबीय शेजारी राहतात. घराच्या परसातील जमिनीच्या हद्दीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये सुमारे दोन वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्याच्या दृष्टीने फिर्यादी स्नेहल मनोहर साळवी यांनी २९ सप्टेंबर रोजी संबंधित जमिनीची शासकीय मोजणी करून घेतली. या मोजणीदरम्यान साळवी यांची काही जमीन देवळेकर यांच्या हद्दीत, तर देवळेकर यांच्या घराचा काही भाग साळवी यांच्या जमिनीत येत असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मोजणीच्या कारणावरून ३० सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास आरोपी चंद्रकांत घोड देवळेकर व दिनेश घोड देवळेकर हे साळवी यांच्या घराकडे आले. यावेळी त्यांनी शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार पाहून नामदेव शंकर साळवी यांनी देवळेकर कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वाद सामोपचाराने मिटवून घेण्याचे आवाहन करत असताना आरोपींपैकी एकाने घराजवळील प्लास्टिकची खुर्ची उचलून नामदेव साळवी यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारानंतर स्नेहल साळवी, त्यांचे वडील मनोहर शंकर साळवी आणि आई सी. मधुरा मनोहर साळवी हे नामदेव साळवी यांची सोडवणूक करण्यासाठी धावून गेले. त्यावेळी सत्यवान घोड देवळेकर याने चिव्याची काठी घेऊन स्नेहल साळवी यांच्या टी-शर्टला धरून त्यांच्या पोटावर व पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे.
यानंतर मनोहर साळवी हे पुढे आले असता चंद्रकांत, दिनेश आणि सत्यवान देवळेकर यांनी चिव्याच्या काठ्यांनी त्यांच्या पायावर व पाठीवर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, मधुरा साळवी यांनाही आरोपींनी ढकलाढकली करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर साळवी कुटुंबीय भीतीने आपल्या घराकडे निघाले असता प्रभात दिनेश देवळेकर आणि सचिन सत्यवान देवळेकर यांनी त्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी स्नेहल मनोहर साळवी (वय ३२, व्यवसाय गृहिणी, सध्या गोरेगाव पूर्व, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत घोड देवळेकर, दिनेश घोड देवळेकर, सत्यवान घोड देवळेकर, प्रभात दिनेश देवळेकर आणि सचिन सत्यवान देवळेकर (सर्व रा. पाल-कुंभारवाडी, ता. लांजा) यांच्याविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत नामदेव शंकर साळवी, मनोहर शंकर साळवी, सी. मधुरा मनोहर साळवी आणि फिर्यादी स्नेहल साळवी हे जखमी झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १८९(२), १११(२), १९०, ११८(१), २१५(२), ३५२, ३५१(२) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलिस करीत आहेत.


