(मुंबई / वार्ताहर)
देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीचे जाळे पसरवणाऱ्या महादेव ॲपविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. मुंबईसह देशातील सहा राज्यांमध्ये एकाच वेळी ३३ ठिकाणी छापे टाकून ऑनलाइन सट्टेबाजीचे पॅनल चालवणाऱ्यांची ठिकाणे तपासण्यात आली. महादेव ॲपचा मुख्य आरोपी आणि प्रमुख प्रवर्तकांपैकी एक असलेल्या सौरभ चंद्राकर याला ओमानमधून भारतात आणल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या छाप्यांदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराचे पॅनल सुरू असल्याचे सीबीआयच्या पथकांना आढळले. संबंधित पथकांनी तातडीने ही पॅनल बंद करून त्यांचे कामकाज थांबवले. कारवाईत मोबाईल फोन, विविध डिजिटल उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या साहित्याच्या तपासातून इतर व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या म्यूल बँक खात्यांचा वापर आणि हवाला नेटवर्कद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे.
दरम्यान, सौरभ चंद्राकर याला ओमानमधून भारतात आणल्यानंतर १ नोव्हेंबरला सीबीआयने अटक केली होती. रायपूर येथील विशेष न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या चौकशीदरम्यान महादेव ॲपचे कामकाज, देशभरातील पॅनल चालकांचे जाळे आणि सट्टेबाजीच्या व्यवहारांची पद्धत याबाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. डिजिटल नोंदी आणि कागदपत्रांच्या आधारेही त्याची चौकशी करण्यात आली. १२ नोव्हेंबरला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
छत्तीसगड सरकारने महादेव ॲपचे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवल्यानंतर या तपास यंत्रणेने महादेव ऑनलाइन बुक ॲपसंदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंतच्या तपासातून या सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचे मुख्य नियंत्रण परदेशातील कार्यालयातून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, भारतातील विविध शहरांमध्ये पॅनल चालकांचे मोठे नेटवर्क कार्यरत होते. हे चालक ग्राहकांना सट्टा लावण्यासाठी आयडी उपलब्ध करून देत तसेच त्यांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या सट्टेबाजीच्या व्यवहारांमधून मिळणाऱ्या पैशांचा मागोवा लागू नये, यासाठी आर्थिक देवाणघेवाणीचे विविध मार्ग वापरले जात असल्याचा संशय आहे. ग्राहकांकडून सट्ट्याची रक्कम स्वीकारण्यासाठी अन्य व्यक्तींच्या नावावर उघडलेली किंवा भाड्याने घेतलेली बँक खाती वापरली जात होती. त्यानंतर या व्यवसायातून मिळणारा पैसा हवाला नेटवर्कच्या माध्यमातून परदेशात पाठवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबईसह सहा राज्यांतील ३३ ठिकाणी केलेल्या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांची आणि कागदपत्रांची सीबीआयकडून सखोल तपासणी सुरू आहे. या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची संपूर्ण साखळी, देशभरातील पॅनल चालकांचे परस्पर संबंध आणि महादेव ॲपच्या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्यावर तपास यंत्रणेचा भर आहे.


