(चिपळूण / वार्ताहर )
शहरालगतच्या खेर्डी येथील दत्त राईस अँड पोहा मिलमध्ये एका ४० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी उघडकीस आली. मिलमध्ये झोपण्यासाठी ठेवलेल्या खाटेवर हा कामगार बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
राजेश हनुमंत पाटील (वय ४०, रा. दत्त राईस अँड पोहा मिल, खेर्डी, ता. चिपळूण) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पाटील हे खेर्डी येथील या राईस अँड पोहा मिलमध्ये कामाला होते. कामाच्या ठिकाणीच त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिलच्या मालकांना ते झोपण्यासाठी ठेवलेल्या खाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळले.
ही बाब लक्षात येताच मिल मालकांनी तेथील कामगार मेहराज इब्राहिम शेख, राजेश पाटील यांची पत्नी अस्मिता राजेश पाटील आणि आई कमल यांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून राजेश यांना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी अस्मिता राजेश पाटील यांनी शनिवारी दुपारी २.२४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (अ.मृ. क्र. ६६/२०२६) अशी नोंद करण्यात आली आहे.
राजेश पाटील यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून, चिपळूण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


