(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुलाच्या निधनाचे दुःख मनात घेऊन गावाकडे आलेल्या वडिलांची प्रकृती काही दिवसांतच खालावली. उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. संतोष शांताराम पालकर (वय ४९, रा. बौद्धवाडी, गोळप, रत्नागिरी) यांच्या मृत्यूने कुटुंबावर अवघ्या काही दिवसांत दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संतोष पालकर यांच्या मुलगा आर्यन याचा १३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. मुलाच्या अंत्यविधीसाठी संतोष पालकर मुंबईहून गोळप येथे आले होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते आणि मद्यपानाचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, संतोष पालकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना २५ ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्या आतड्याला छिद्र पडल्याचे तसेच मूत्रपिंडाशी संबंधित सूज असल्याचे निदर्शनास आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यकृतावरील शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.
२८ ऑगस्ट रोजी केईएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळण्यापूर्वीच २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. एका बाजूला मुलाच्या निधनाचे दुःख आणि त्यानंतर काही दिवसांतच वडिलांचा मृत्यू, या दुहेरी आघाताने पालकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, BNSS कलम १९४ अन्वये एडीआर क्रमांक ३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.


