(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मोबाइल हॅक करून बँक खात्याशी संबंधित माहितीचा गैरवापर करत चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाइलचा ताबा मिळवल्यानंतर डेबिट कार्डचा गैरवापर करून दोन लाख रुपये वळविल्याचा, तसेच मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बिपिन रसिकलाल शहा (५७, व्यवसाय-चार्टर्ड अकाउंटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ या अवघ्या २३ मिनिटांच्या कालावधीत हा प्रकार घडला. बिपिन शहा हे तेली आळीतील ज्युतिका अपार्टमेंट येथे त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा, रसिकलाल शहा यांचा मोबाइल हॅक केल्याचा आरोप आहे.
मोबाइलचा ताबा मिळवल्यानंतर संबंधित व्यक्तीने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड आपल्या ताब्यात घेतल्याचे भासवून त्याचा वापर केला. त्यानंतर बिपिन शहा यांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यात आले. या प्रकारामुळे शहा यांचे एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये इतके आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.


