(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील जिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रातील खाजन परिसरात ९ जुलै रोजी आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. रत्नागिरी पोलिसांच्या ‘RAIDS’ (Rapid AI-based Identification & Detection System) या ॲपच्या माध्यमातून मृत व्यक्तीच्या छायाचित्रावर प्रक्रिया करून त्याच्या संभाव्य स्वरूपातील विविध AI-reconstructed images तयार करण्यात आल्या आहेत. या प्रतिमा प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित करून पोलिसांनी नागरिकांना ओळख पटविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
९ जुलै २०२६ रोजी खाजन परिसरात अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या अंगावर मळलेला व फाटलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट आणि लेदरचा बेल्ट होता. तसेच त्याने निळ्या रंगाची पूर्ण लांबीची अंतर्वस्त्रे परिधान केली होती. त्याच्या उजव्या मनगटावर निळ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचा टॅटू असून, त्यामध्ये काही अक्षरे अथवा खुणा कोरलेल्या आहेत. मात्र ती अस्पष्ट असल्याने त्यांचा नेमका अर्थ अथवा मजकूर स्पष्ट होत नाही. या प्रकरणाची माहिती बाणकोट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मितेश केणी यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी आपल्या ‘RAIDS’ प्रणालीचा वापर केला.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे उपलब्ध छायाचित्र RAIDS ॲपवर अपलोड करण्यात आले. त्यानंतर AI आधारित प्रक्रियेद्वारे छायाचित्राचे विश्लेषण करून मृत व्यक्तीच्या संभाव्य स्वरूपातील विविध प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांच्या मदतीचा आधार घेतला आहे. AIच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या प्रतिमा वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि अन्य माध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहेत. या प्रतिमांवरून संबंधित व्यक्तीची ओळख पटत असल्यास किंवा मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.
अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पारंपरिक तपासासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रत्नागिरी पोलिसांनी तपासाला आधुनिक स्वरूप दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख पटण्यास AI तंत्रज्ञानाची मदत कितपत निर्णायक ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.

