(विल्ये / अमित कांबळे)
आंबेडकरी जलसा कलेचा वारसा जतन करण्यासह नवोदित आणि कार्यरत बौद्ध कलावंतांना गायन व वादनाचे कौशल्य आत्मसात करता यावे, या उद्देशाने धम्मक्रांती कला मंच, तालुका रत्नागिरी यांच्या वतीने आज, शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मोफत हार्मोनियम आणि ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही कार्यशाळा सुरू राहणार आहे.
रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यरत बौद्ध कलावंतांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे. आंबेडकरी जलसा कलेतील गायन पद्धतीनुसार हार्मोनियम व ढोलकी वादनाचे प्रशिक्षण यावेळी दिले जाणार आहे. नवोदित तसेच सध्या कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वादन कलेची आवड असलेल्या कलाकारांना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
धम्मक्रांती कला मंच ही संघटना विविध सामाजिक, कलात्मक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मंचाचे अध्यक्ष रविकांत पवार, सचिव सतीश कदम यांच्यासह अन्य कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी धम्मक्रांती कला मंचाकडे नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी रविकांत पवार यांच्याशी ९४२१२ २९३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


