(संगमेश्वर/ प्रतिनिधी )
तालुक्यातील पुर येथे भारतीय बौद्ध महासभाच्या ग्रामशाखेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तालुका शाखा संगमेश्वर अंतर्गत विभाग देवरुखच्या ग्रामशाखा पुरतर्फे आयोजित हे शिबिर रविवारी सारनाथ बुद्ध विहार येथे संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बुद्धमूर्तीला पुष्प अर्पण, महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार वाहून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. तालुका अध्यक्ष राहुल मोहिते यांनी शिबिर उद्घाटनाची घोषणा केली. ग्रामशाखा पुरच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शिबिरात संघटनात्मक कार्यपद्धती आणि वैचारिक बांधिलकी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव यांनी ‘दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेची ध्येय-उद्दिष्टे, वाटचाल आणि कार्यकर्त्याची प्रबोधनपर आचारसंहिता’ या विषयावर प्रभावी विवेचन केले. तसेच विजय कांबळे यांनी शाखेचे कामकाज, जमाखर्च अहवाल लेखन, तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले.
यावेळी महेंद्र जाधव, प्रकाश कांबळे, सुरेश कांबळे, संजय जाधव, अशोक मोहिते, जनार्दन कांबळे, सुधाकर कांबळे, भाग्यश्री कांबळे आणि दिनेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष कांबळे यांनी केले. महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती या शिबिराचे वैशिष्ट्य ठरली. शेवटी आभार प्रदर्शनानंतर शरणत्तेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

