(दापोली /रत्नागिरी)
काविळ झाल्याने दमा आणि तापाचा त्रास होत असलेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. कीर्ती किशोर जगदाळे (वय ३०, रा. बांधतिवरे-बांधवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
कीर्ती जगदाळे यांना काविळ झाल्याने त्यांना दमा तसेच तापाचा त्रास होत होता. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.५३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी नोंद घेतली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ७१/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
या घटनेने बांधतिवरे-बांधवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूच्या घटनेबाबत पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.


