(चिपळूण /रत्नागिरी)
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिपळूणमध्ये पकडले. तिच्याकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह एक चारचाकी वाहन आणि मोबाइल असा एकूण १० लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास चिपळूण-कराड मार्गालगत, खेर्डी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ अमित अशोक कदम हे पथकासह चिपळूण बहादूरशेख नाका ते खेर्डी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी खेर्डी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संशयास्पदरीत्या एक चारचाकी वाहन आढळून आले. तपासणी केली असता वाहनातून महाराष्ट्र शासनाने जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत केसरयुक्त विमल पान मसाल्याची ८८० पाकिटे, व्ही-१ तंबाखूची ८८० पाकिटे, आरएमडी पान मसाल्याची ७८ पाकिटे आणि एम सेंटीड तंबाखू गोल्डची ७८ पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रतिबंधित पदार्थांची एकूण किंमत ३ लाख १० हजार ६०० रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इन्ट्रा व्ही२० चारचाकी (एमएच १२ एसएफ २४१२), अंदाजे सात लाख रुपये किमतीची, तसेच पाच हजार रुपये किमतीचा रेडमी १४सी ५जी मोबाइल असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. अशा प्रकारे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख १५ हजार ६०० रुपये आहे.
या प्रकरणी सेजल सुनील आवळे (वय २२, रा. यशवंतनगर बस स्टॉपजवळ, चावला गल्ली, मिरज, जि. सांगली) हिला ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.०७ वाजता अटक करण्यात आली. आवळे हिच्याविरुद्ध यापूर्वीही सांगली व सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संजयनगर पोलिस ठाणे, सांगली येथे २०२५ मध्ये गुन्हा दाखल असून, वेळापूर पोलिस ठाण्यात २०२६ मध्ये गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संदर्भातील गुन्हाही दाखल असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलिस पुढील तपास करीत आहेत.


