(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुरेंद्र तानाजी खाडे हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी नियतवयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी प्रशासनातील कार्यक्षम अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सुरेंद्र खाडे यांनी ३ जून १९९३ रोजी जिल्हा परिषद सेवेत प्रवेश केला. त्यानंतरच्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम करत प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. त्यांच्या अतिउत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने त्यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असताना खाडे यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी नेहमीच मैत्रीपूर्ण आणि आपुलकीचे संबंध जपले. सहकाऱ्यांशी चर्चा करून तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत धोरणात्मक निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय ठरली.
वयाची ५८ वर्षे पूर्ण करून त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीतील आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


