(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वच्या सर्व गटांमध्ये विजय मिळवत दणदणीत कामगिरी केली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच निकाल स्पष्ट झाले आणि शिवसेनेच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोषाला उधाण आले. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच समर्थकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
या निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यातील सर्व दहा जिल्हा परिषद गटांत शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. वाटद (गट क्र. ३०) मधून उषा राजेश सावंत यांनी उबाठाच्या संज्योत चव्हाण यांचा पराभव केला. खालगाव (गट क्र. ३१) मध्ये महेश उर्फ बाबू म्हाप यांनी विनोद शीतप यांना नमवले. कोतवडे (गट क्र. ३२) मध्ये राजेश साळवी यांनी उत्तम मोरे यांचा पराभव केला.
झाडगाव (म्यु. बाहेर) गटातून श्रद्धा दीपक मोरे यांनी आस्था धांगडे यांना पराभूत केले. खेडशी (गट क्र. ३४) मध्ये हर्षदा गावडे यांनी स्मितली नार्वेकर यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. हातखंबा (गट क्र. ३५) मध्ये शिवसेनेच्या सुयोग कांबळे यांनी अपक्ष परशुराम कदम यांचा पराभव केला.
नाचणे (गट क्र. ३६) मध्ये प्रकाश रसाळ यांनी उबाठाच्या शशिकांत बारगोडे यांना नमवले. कर्ला (गट क्र. ३७) मधून महेंद्र झापडेकर यांनी विलास भातडे यांचा पराभव केला. गोळप (गट क्र. ३८) मध्ये नंदकुमार मुरकर यांनी अपक्ष उदय बने यांच्यावर मात केली. पावस (गट क्र. ३९) मध्ये महेंद्र मांडवकर यांनी उबाठाच्या किरण तोडणकर यांचा पराभव केला. या निकालामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक भक्कम असल्याचे चित्र दिसून येत असून, हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनतेने दिलेल्या विश्वासाचा ठाम कौल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

