( रत्नागिरी / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात आज (शुक्रवारी) चारचाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरदार धडकले. या अपघातात ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला, तर चालक केबिनमध्ये अडकून पडला.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक मेदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवत बचावकार्याला सुरुवात केली.
चालक ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकल्याने एमआयडीसी रत्नागिरी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. उपअग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी विशेष उपकरणांच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत चालकाची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण आणि अन्य बाबींचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

