(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मदतीच्या बहाण्याने ओळख वाढवत एका प्रौढ व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून तब्बल १७ लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, रा. उमरे, ता. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रा. रत्नागिरी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२५ रोजी रामचंद्र केळकर हे आपल्या भावाची विचारपूस करण्यासाठी शहरातील एका रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरैय्या हकीम या महिला रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशी केल्यानंतर मुलाचे ऑपरेशन झाले असून रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मानवतेच्या भावनेतून केळकर यांनी त्यांना आपला मोबाईल क्रमांक देत मदतीचे आश्वासन दिले. यानंतर सुरैय्या हिने संपर्क साधत आर्थिक मदतीची मागणी केली. मारुती मंदिर परिसरात झालेल्या भेटीत केळकर यांनी तिला रोख रक्कम दिली, तर नंतर गुगल पेद्वारेही काही पैसे पाठविले. मात्र त्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.
दुसऱ्याच दिवशी एका अनोळखी व्यक्तीने केळकर यांना फोन करून सुरैय्यासोबत झालेल्या संभाषणाची ध्वनिमुद्रिका आपल्याकडे असल्याचा दावा केला. ती सार्वजनिक करून बदनामी करण्याची धमकी देत सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येण्याच्या भीतीने केळकर यांनी संबंधित खात्यावर रक्कम जमा केली. मात्र त्यानंतर धमक्यांचे सत्र थांबले नाही. उलट, संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक व मित्रपरिवाराला पाठविण्याची भीती दाखवत वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. या मानसिक दबावाखाली केळकर यांनी जुलै २०२५ ते मे २०२६ या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपये संशयितांच्या खात्यांमध्ये जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.
सततच्या आर्थिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर केळकर यांनी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू असून, ब्लॅकमेलिंगच्या या जाळ्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.

