(संगमेश्वर /प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित आणि नियमित वाहतूक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अनागोंदी कारभाराचा फटका संगमेश्वर तालुक्यातील धामणी-बडदवाडी येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शालेय फेरीची एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना दररोज पायी प्रवास करावा लागत असून, यामुळे त्यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धामणी-बडदवाडी येथून संगमेश्वर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक वर्षांपासून संगमेश्वर–धामणी–बडदवाडी ही शालेय एसटी फेरी सुरू होती. मात्र, कोणतेही ठोस कारण न देता ही बस सेवा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दररोज लांबचा पायी प्रवास करून शाळेत पोहोचताना विद्यार्थ्यांना उशीर होत असून, शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरही परिस्थिती अधिक गंभीर बनते. बडदवाडीतील विद्यार्थ्यांना संगमेश्वर किंवा शास्त्री पूल परिसरात बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा अंधार पडेपर्यंत त्यांना रस्त्यावर थांबावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकांनी वारंवार देवरुख आगाराशी संपर्क साधत लेखी अर्ज व निवेदने दिली. मात्र, त्याकडे प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. वारंवार विनंत्या करूनही बस सेवा पूर्ववत न झाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रशासनाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ धामणी-बडदवाडी येथील पालकांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून वाहतूक व्यवस्थेअभावी आपल्या मुलांचे शालेय शिक्षण बंद करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि पालकांनी संबंधित विभागांकडे पत्रव्यवहारही केला आहे. विभागीय वाहतूक नियंत्रक, रत्नागिरी यांना पाठविलेल्या सह्यांनिशी निवेदनात, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय एसटी फेरी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहतुकीअभावी मुलांचे शिक्षण बंद करण्याची वेळ आमच्यावर आली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या संवेदना जाग्या असतील तर त्यांनी तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन बस सेवा पूर्ववत सुरू करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याच्या घोषणा एका बाजूला होत असताना, प्रत्यक्षात मूलभूत वाहतूक सुविधेअभावी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचे हे चित्र प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे.

