(रत्नागिरी / वार्ताहर)
रेल्वेमार्गे होणारी गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबविलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर कारवाई केली. गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनलगतच्या दुसऱ्या जनरल डब्यात बेवारस आढळलेल्या बॅगेतून गोवा निर्मित छोट्या दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या.
बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आरपीएफकडून नियमित तपासणी सुरू होती. यावेळी इंजिनच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. बॅगेवर कोणाचाही दावा नसल्याने आरपीएफच्या पथकाने ती ताब्यात घेतली आणि पुढील तपासणीसाठी रत्नागिरी आरपीएफ पोस्टवर आणली.
आरपीएफ पोस्टवर बॅग उघडून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या छोट्या दारूच्या १०० बाटल्या आढळल्या. त्यानंतर नियमानुसार जप्ती पंचनामा करण्यात आला. जप्त केलेला मद्यसाठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शहर शाखा, रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
ही कारवाई स.उ.नि. अशोक आर्य आणि ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी केली. रेल्वेमार्गे होणारी अवैध मद्य वाहतूक, तस्करी तसेच बेवारस साहित्याच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आरपीएफकडून विशेष तपासणी सुरू आहे. ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या नेमक्या कोणाच्या आहेत आणि त्या कुठे नेल्या जात होत्या, याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणार आहे.


