(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेश विसर्जनाच्या दिवशी सोनवी नदीपात्रातील बेकायदा उत्खननामुळे तयार झालेल्या मानवनिर्मित डोहात बुडून उच्चशिक्षित तरुण प्रज्वल घडशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटूनही संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि जबाबदार यंत्रणेविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संगमेश्वरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रज्वलच्या मृत्यूनंतरही हे प्रकरण ‘रात गई, बात गई’ या भूमिकेतून दडपले जाणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोनवी आणि परचुरी नदीपात्रात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पोकलेन मशीन आणि अवाढव्य हायवाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणारी वाळू उपलब्ध करून देताना नदीपात्राची समपातळी राखण्यासह सुरक्षेचे निकष पाळणे आवश्यक असतानाही, ठिकठिकाणी मोठे आणि धोकादायक डोह तयार झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू बाहेर नेण्यात आली असून, शासनाचा महसूलही बुडाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नदीपात्रातून दररोज मोठ्या संख्येने वाळूची वाहतूक होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाचे अधिकारी नेमकी कोणती कारवाई करत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नदीपात्राचे नुकसान, महसुलाचे नुकसान आणि संभाव्य जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी वेळीच कारवाई का केली नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणपती विसर्जनासाठी नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने येत असलेल्या ठिकाणी धोकादायक डोह तयार झाल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी या धोकादायक खड्ड्यांबाबत पूर्वकल्पना देऊन ते बुजविण्याची तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स आणि धोक्याचे सूचना फलक लावण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे.
अखेर गणेश विसर्जनादरम्यान प्रज्वल घडशी याचा पाय घसरून तो या मानवनिर्मित डोहात बुडाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त झाली. धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स किंवा सूचना फलक असते, तर हा अनर्थ टाळता आला असता, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रज्वलचा मृत्यू हा केवळ अपघात नसून त्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि यंत्रणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाकडून चौकशी तसेच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रकरणाची पुढील दिशा काय आहे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि महसूल विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांची भूमिका तपासली जाणार का, याकडे संगमेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रज्वल घडशीच्या मृत्यूला जबाबदार कोण, नदीपात्रातील बेकायदा उत्खननाबाबत यंत्रणांकडून वेळीच कारवाई का झाली नाही आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दोष निश्चित करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार की हे प्रकरणही कागदोपत्री चौकशीपुरतेच मर्यादित राहणार, याबाबत आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.


