(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजिवडा खाडी आणि मांडवी खाडीमुखातील गाळ, वाळू व सॅण्ड बारच्या समस्येचा प्रश्न वर्षानुवर्षे मांडला जात असताना आता प्रत्यक्ष कामाला विलंब का, असा सवाल मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. भाट्ये येथे ब्रेकवॉटरचे काम सुरू झाले असताना त्याच्याशी पूरक असलेले राजिवडा खाडीतील गाळ उपशाचे कामही तातडीने सुरू करा, अशी मागणी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी व मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजिवडा खाडी व मांडवी खाडीमुखात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ, वाळू आणि सॅण्ड बार साचत असल्याने मच्छीमारांच्या नौकांच्या सुरक्षित ये-जा करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः लहान नौकांना कमी पाण्याची खोली आणि साचलेल्या गाळाचा मोठा फटका बसत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. नौका अडकणे, नुकसान होणे आणि जीविताला धोका निर्माण होण्याच्या घटना घडल्याचा दावाही करण्यात आला आहे. या समस्येवर गेल्या चार-पाच वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे समितीने म्हटले आहे. यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. जनता दरबारात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासमोर अनेकदा गाळ आणि बंधाऱ्याचा प्रश्न मांडण्यात आल्याचे समितीने नमूद केले आहे. तसेच खासदार नारायण राणे यांची भेट घेऊनही हा प्रश्न मांडण्यात आला होता. या पाठपुराव्याला लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल समितीने त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, प्रश्न मार्गी लागण्याच्या टप्प्यावर आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला विलंब होऊ नये, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
भाट्ये येथे ब्रेकवॉटर अथवा ग्रोयन्सचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे राजिवडा खाडीतील गाळ उपशाचे कामही त्याच गतीने पुढे नेणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. ब्रेकवॉटर आणि गाळ उपसा ही परस्परपूरक कामे असल्याने एका कामाला गती आणि दुसऱ्या कामाला विलंब, अशी विसंगत स्थिती राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, काही नागरिकांकडून या कामाच्या तांत्रिक आणि पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या शंकांची कागदपत्रे, तांत्रिक अहवाल आणि आवश्यक निकषांच्या आधारे पडताळणी करावी; मात्र त्याचा आधार घेऊन मच्छीमारांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला अनिश्चित काळासाठी विलंब करू नये, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
मच्छीमारांच्या सुरक्षित नौकानयनाचा प्रश्न केवळ मागणी किंवा आश्वासनापुरता न राहता त्यावर ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यामुळे गाळ उपशाच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करून ते तातडीने सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी राजिवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, सल्लागार शकील दावत, रहीम दलाल, लुकमान कोतवडेकर आदी उपस्थित होते.


