(देवळे / प्रकाश चाळके)
अतिवृष्टीमुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्त्याचे नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्याने आंबा घाट वाहतुकीसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एसटी वाहतूकही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखरपा, कोंडगाव परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून साखरपा-रत्नागिरी मार्गावर दिवसभर एसटीच्या फेऱ्या सुरू ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर यापूर्वी दिवसभरात एसटीच्या सुमारे २५ ते ३० फेऱ्या सुरू होत्या. मात्र, आंबा घाटातील वाहतूक बंद झाल्याने रत्नागिरीकडे तसेच कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह रेल्वे स्थानक, शासकीय कार्यालये तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
ही समस्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत ऊर्फ बापू शिंदे यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. आंबा घाट बंद असल्याच्या कालावधीत साखरपा-रत्नागिरी मार्गावर दिवसभर एसटीच्या फेऱ्या किंवा शटल सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी आमदार सामंत यांच्याकडे केली.
या मागणीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून याबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे साखरपा-रत्नागिरी मार्गावर दिवसभर शटल सेवा सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आमदार किरण सामंत यांनी नागरिकांच्या अडचणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत, साखरपा-कडोंगाव परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास प्रशांत ऊर्फ बापू शिंदे यांनी व्यक्त केला.

