(राजापूर / तुषार पाचलकर)
“एसआयआरसाठी गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. मतदार हा लोकशाहीचा आधार असून जुन्या मतदारांची पुनर्पडताळणी, नावातील तसेच गावातील बदल यासह विविध कामे सुरू आहेत. लोकशाहीतील तरुणाईचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. काही कारणांमुळे नवमतदारांची नोंदणी रखडली असेल, तर ती तात्काळ करून घ्यावी. परंपरागत मतदारांसोबतच बलशाली लोकशाहीसाठी तरुणांची नवमतदार नोंदणी गरजेची आहे. तरुणांनी आपल्यासोबत १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांची मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी. यासाठी सर्वांनी मतदार नोंदणीची चळवळ हाती घेऊया,” असे आवाहन पाचलचे मंडळ अधिकारी संजय पवार यांनी केले.
श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘एनएसएस सप्ताहा’अंतर्गत ‘नवमतदार नाव नोंदणी अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक कृषी अधिकारी दीपक सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी सूर्यकांत लांडगे, लक्ष्मण नरके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, बीएलओ तसेच अंगणवाडी सेविका रिद्धी लिंगायत आणि सिद्धी निखार्गे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकातून डॉ. विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. दीपक सोनवणे आणि सूर्यकांत लांडगे यांनी मनोगत व्यक्त करत नवमतदार नोंदणीची गरज आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय-हक्कांसाठी सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले. “लोकशाहीने मतदानाचा दिलेला अधिकार हे आपल्या हातातील खूप मोठे शस्त्र आहे. मात्र, हा अधिकार बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम आपली मतदार म्हणून नोंदणी केली पाहिजे. आपल्या परिसरातील नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. जी. चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी रिद्धी लिंगायत आणि सिद्धी निखार्गे यांनी नवमतदारांचे सहा नंबर फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह भरून घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


