( राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, तालुका सरचिटणीस श्री. समीर जनार्दन खानविलकर यांनी राजापूर पोलिसांकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या या निवेदनामुळे तालुक्यातील अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निवेदनात पाचल येथे राहणाऱ्या श्री. शशांक रविंद्र नारकर यांच्याकडून राजापूर तालुक्यात जुगार, मटका, ऑनलाइन जुगार अशा विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध धंद्यांमुळे समाजातील तरुण पिढी वाया जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास कोणीही धजावत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अवैध धंद्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खानविलकर यांनी केली आहे.
यापुढे कारवाई झाली नाही तर हा विषय थेट आंदोलनाच्या माध्यमातून उचलून धरला जाईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. “कायदेशीर कारवाई करून सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत,” अशी मागणी करत प्रशासनाला कारवाईसाठी थेट आव्हान देण्यात आले आहे.
दरम्यान, या तक्रारीची राजापूर पोलिस प्रशासनाने दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राजापूर तालुक्यातील कथित जुगार, मटका आणि ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा हातोडा कधी पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीप : तक्रारीतील आरोपांची पोलिस प्रशासनाकडून चौकशी केली जाणार असून, तपासाअंतीच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

