(लांजा/ रत्नागिरी)
दोन बैलांना आखूड दोरीने बांधून, हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटीने बोलेरो पिकअपच्या हौद्यात कोंबून वाहतूक केल्याचा प्रकार लांजा-दाभोळे मार्गावर करचंब फाटा येथे उघडकीस आला. या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत दोन बैलांसह सुमारे २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता लांजा-दाभोळे रस्त्यावरील करचंब फाटा येथे पोलिसांना एमएच-०९-जीजे-२८२५ क्रमांकाची बोलेरो पिकअप संशयास्पद स्थितीत आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता त्याच्या हौद्यात दोन बैल दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांच्या नोंदीनुसार, बैलांना वेदना होतील अशा पद्धतीने आखूड दोरीने बांधण्यात आले होते. त्यांना हालचाल करता येणार नाही अशा प्रकारे वाहनाच्या हौद्यात कोंबण्यात आल्याचा आरोप आहे. वाहनाचा हौदा चारही बाजूंनी बंदिस्त करण्यात आला होता. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. बैलांना वाहतुकीदरम्यान दुखापत होऊ नये यासाठी वाहनात आवश्यक विभाजन करण्यात आले नव्हते. तसेच जनावरांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार पेटी तसेच वाहनावर जनावरांची वाहतूक केली जात असल्याचा आवश्यक फलक नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी १० हजार ५०० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा सुमारे सहा वर्षांचा गावठी बैल आणि १० हजार ५०० रुपये किमतीचा पांढरा-तांबूस क्रॉस जर्सी बैल जप्त केला. याशिवाय सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली. अशा प्रकारे सुमारे २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सत्यजित गंगाराम कोलापटे (२३, रा. आंबा-मानोली, धनरवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि सरेश धोंडीबा बरागडे (३३, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आनंदा कळंत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३(५), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(डी), (ई), (एफ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९, प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ मधील कलम ४७, ४८, ४९, ५४, ५६ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६६/१९२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्राण्यांची वाहतूक कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याबाबत पुढील तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.


