(राजापूर/ रत्नागिरी)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या नागरिकांसाठी राजापूर येथे कार्यरत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र मोठा दिलासा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या केंद्रात तब्बल ८,६२६ पासपोर्ट अर्जांची नोंदणी झाल्याने लोकांच्या प्रतिसादात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि अनावश्यक कागदोपत्री त्रास मोठ्या प्रमाणावर वाचत आहे.
२०१८ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून राजापूर पोस्ट कार्यालयात या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. कोविडकाळातील निर्बंधांचा अपवाद वगळता, या केंद्राला सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या नोंदणींची माहिती केंद्र प्रशासनाने दिली आहे.
पूर्वी पासपोर्टसाठी नागरिकांना मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागत होता. वेळखाऊ प्रक्रिया, गर्दी आणि खर्च यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागे. मात्र, राजापूर येथे सेवा केंद्र सुरू झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची ही कोंडी सुटली आहे. तांत्रिक सुविधा, कार्यक्षम कर्मचारीवर्ग आणि सुरळीत प्रक्रिया यामुळे पासपोर्टसंबंधीचे अनेक प्रश्न निकाली निघाले आहेत. स्थानिक पातळीवरील या सेवेमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. तळकोकणातील नागरिकांसाठी राजापूरचे पासपोर्ट सेवा केंद्र हे निश्चितच एक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणारे पाऊल ठरले आहे.

