(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील कशेळी (आगवेकरवाडी) येथील संतोष बबन मांडवकर (वय 45) या व्यक्तीविरुद्ध एका तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वारंवार व्हॉट्सअॅपवरून अनुचित संदेश पाठवून तरुणीच्या विनयशीलतेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बी.एन.एस. कलम 78(2) व 79 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटना उघड झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना त्याला वाचविण्यासाठी गावातील दोन राजकीय पक्षाशी संबंधित पुढारी आरोपीला पाठीशी घालण्यासाठी आणि कारवाई होऊ नये यासाठी रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत पोलीस ठाण्यात थांबून होते. त्यांच्या या वागणुकीमुळे महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, राजकीय दबावामुळे पोलीस तपासावर परिणाम होईल का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
परिसरातील महिला संघटना आता सरसावल्या असून, आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी यासाठी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. काही महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आरोपीला राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन गाव पुढाऱ्यांच्या कृतीबाबत त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ही बाब पोहोचवणार आहोत.”
या घटनेबाबत सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, “महिला संदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट-ट्रॅकवर चालवण्यासाठीही प्रयत्न केले जातील.”
महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सुरक्षिततेशी निगडित अशा गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. आरोपीविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नवदुर्गांचा उत्सव सुरू असताना एका महिलेबाबत घडलेल्या या घटनेची दखल राजापूर लांजा विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घेतली आरोपी विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

