(राजापूर / प्रतिनिधी)
शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ परिसरात अनधिकृत मासेविक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना एका महिलेकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. धोपेश्वर पन्हळे, ता. राजापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार यांच्यासह नगर परिषद पथक बाजारपेठ परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी अनिसा रशीद फणसोपकर (वय ४०, रा. कातळी सागवे, ता. राजापूर) या महिलेकडून रस्त्यालगत मासेविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांना अधिकृत मच्छीमार्केटमध्ये जाऊन व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संबंधित महिलेकडून जागा सोडण्यास नकार देत तेथेच मासेविक्री सुरू ठेवण्यात आली.
यानंतर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नियमांनुसार कारवाई करत माशांची टोपली ताब्यात घेतली. मात्र, त्यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या मागे धावत जाऊन टोपली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करू लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर नगर परिषद कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील टोपली खेचून घेत हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ आणि ३५२, तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ मधील संबंधित कलमे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

