( राजापूर )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातीवले टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव राजेश शेखर नायडू (वय ३५) असे असून, ही माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
एमएच 02 ईझेड 4748 क्रमांकाची महिंद्रा मराझो कार मुंबईतील मालाडहून कणकवलीतील भिरकोन्ड येथे नातेवाईकांकडे जात होती. गाडीत एकूण सहा जण प्रवास करत होते. वाटेत चहा-नाश्ता करून ते पुढे निघाले असता हातीवले टोल नाक्यावर गाडीने पुढे जात असलेल्या एमएच 10 ए डब्ल्यू 8144 क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली.
या धडकेत कारमधील राजेश नायडू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. इतर पाच जण जखमी झाले असून, त्यांना प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक तसेच मुन्ना खामकर, राजू कुरुप, नरेन कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर, संदीप राऊत यांनीही मदतीसाठी तत्परतेने सहभाग घेतला.

