(पुणे / वृत्तसंस्था)
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासातून केतन आणि सिया गोयल यांच्या नात्याशी संबंधित आणखी एक माहिती समोर आली आहे. सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला खास सरप्राइज देण्याची केतनची तयारी होती. यासाठी त्याने आपल्या पाठीवर ‘Siya’ हे तिचे नाव टॅटूच्या स्वरूपात गोंदवून घेतले होते. या टॅटूचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
सियाचा वाढदिवस १९ जून रोजी होता. वाढदिवशी हा टॅटू सियाला भेट म्हणून दाखवण्याचा केतनचा विचार होता. त्याने यासाठी आधीपासूनच हे सरप्राइज नियोजित केले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाढदिवस येण्यापूर्वीच केतनची हत्या झाल्याने त्याचे हे नियोजन अपूर्ण राहिले.
सियाचा वाढदिवस लोहगडावर साजरा करण्यासाठी केतन आणि सिया तेथे गेले होते. मात्र, याच लोहगडावर केतनचा घात झाला. १८ जून रोजी लोहगडावरून पाय घसरून पडल्याने केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, केतनच्या पाठीवरील ‘Siya’ नावाच्या टॅटूची माहिती त्याची बहीण संजना अग्रवाल हिने पोलिसांना दिली आहे. केतनच्या मृत्यूनंतर संजनाने त्याचा मोबाईल फोन पाहिला होता. त्यामध्ये टॅटूचा फोटो सापडल्यानंतर तो सियाला दाखवण्याचे तिने ठरवले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या पाच हजारांहून अधिक पानांच्या आरोपपत्रात संजनाच्या जबाबाचाही समावेश आहे.
आरोपपत्रातील माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी संध्याकाळी सिया तिच्या आई-वडिलांसह आणि इतर नातेवाईकांसोबत केतनच्या घरी गेली होती. त्यावेळी संजनाला केतनच्या मोबाईलमध्ये सापडलेला फोटो सियाला दाखवायचा होता. मात्र, त्या वेळी फोटो दाखवता आला नाही. घरी परतल्यानंतर सियाने सायंकाळी सुमारे ७.३० वाजता संजनाला व्हॉट्सॲप मेसेज केला. “केतनने माझ्यासाठी काय गिफ्ट आणले आहे?” असा मेसेज तिने केला होता.
यानंतर संजनाने नंतर कॉल करते, असा मेसेज सियाला पाठवला. रात्री १० वाजता संजनाने सियाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. या कॉलदरम्यान तिने केतनच्या मोबाईलमध्ये सापडलेला फोटो सियाला दाखवला. त्या फोटोमध्ये केतनच्या पाठीवर ‘सिया’ नावाचा टॅटू दिसत होता. फोटो दाखवल्यानंतर संजनाने व्हिडिओ कॉल समाप्त केला.
त्यानंतर २० जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता सियाने संजनाला मेसेज केला. केतनच्या प्रोफाइल पिक्चरमधून त्यांचा फोटो काढून टाकण्यास तिने सांगितल्याचे संजनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन अग्रवाल यांना अटक केली आहे. दोघांनी केतनची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच हजारांहून अधिक पानांच्या आरोपपत्रातून हत्येचा कट आणि तो राबवण्याच्या पद्धतीबाबत अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. तपासानुसार, आरोपींनी इंटरनेट, सोशल मीडिया आणि पॉडकास्टचा वापर करून केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. हत्या करण्याचा कट कधी आणि कसा रचण्यात आला, याचा तपशील आरोपपत्रात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच साक्षीदारांना धमकावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला असून, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.


