( पुणे / पिंपरी-चिंचवड)
आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हे शाखेने काही तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. सहा वर्षीय बालिका धनश्री केदारी आणि 70 वर्षीय मंगल शिंदे यांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विनायक भवारी (वय 31) याला आळेफाटा येथून ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा मृत चिमुकली धनश्रीचा नात्याने आजोबा असल्याचे तपासात समोर आले आहे.
परिचयाचा फायदा घेत घरात प्रवेश
तपासात उघड झाले की, बुधवारी रात्री आरोपी घरात आला. घरातील व्यक्तींना तो ओळखीचा आणि जवळचा नातेवाईक असल्याने त्याच्याबाबत संशय आला नाही. त्या वेळी घरात धनश्री आणि मंगल शिंदे झोपल्या होत्या, तर संगीता केदारी नाईट ड्युटीसाठी बाहेर गेल्या होत्या. प्राथमिक तपासानुसार, मंगल शिंदे या संगीता केदारी यांना आरोपीविरुद्ध भडकवत असल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. या संशयातूनच त्याने प्रथम मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून हत्या केली. यानंतर सहा वर्षीय निष्पाप धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
गुन्ह्यानंतर पळ; काही तासांत अटक
घटना घडल्यानंतर आरोपी आळेफाटा येथे लपून बसला होता. मात्र गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे सापळा रचत त्याला अटक केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
सोशल मीडियावर ओळख, प्रेमविवाह आणि वाद
दरम्यान, संगीता केदारी आणि आरोपी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला होता. काही काळापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने आरोपी वेगळा राहत होता. याच पार्श्वभूमीवर संशयातून हा दुहेरी खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः एका लहान निष्पाप मुलीचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

