(चिपळूण /रत्नागिरी)
मोबाईलवर सतत चॅटिंग करीत असल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावून मोबाईल काढून घेतल्याने नाराज झालेली १८ वर्षे ६ महिन्यांची तरुणी घरातून निघून गेल्याची घटना चिपळूण तालुक्यातील पेढे-माळेवाडी येथे घडली आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर तरुणीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिया जगदीश चिवेलकर (वय १८ वर्षे ६ महिने, रा. पेढे, माळेवाडी, ता. चिपळूण) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. तिचे वडील जगदीश यशवंत चिवेलकर (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दसऱ्याच्या सणापूर्वी त्यांनी मुलीला नवीन मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, ती या मोबाईलवर वारंवार चॅटिंग करीत असल्याने वडिलांनी तिला समजावून सांगत रागावले आणि तिचा मोबाईल काढून घेतला होता. याच कारणावरून १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिया कोणालाही काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. त्यानंतर वडिलांनी नातेवाइकांकडे तसेच आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी जगदीश चिवेलकर यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


