(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात कौटुंबिक वादातून पतीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावभाग परिसरातील त्रिशूल चौकात रविवारी पहाटे पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सागर दीपक बुरसे (वय ३५) यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, घटनेनंतर संशयित पत्नी वैशाली सागर बुरसे हिने आपल्या वडिलांना आणि भावाला माहिती दिली आणि लहान मुलीला सोबत घेऊन गावभाग पोलीस ठाणे गाठले. तेथे तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे.
सागर बुरसे हे इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सागर आणि वैशाली यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत होते. मतभेद वाढल्याने काही वर्षांपूर्वी दोघे विभक्त राहू लागले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक पातळीवर मध्यस्थी झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. तरीही त्यांच्यातील वाद पूर्णपणे मिटले नव्हते आणि वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडतच होते.
रविवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. त्यानंतर सागर झोपले असताना वैशालीने घरातील खलबत्ता उचलून त्यांच्या डोक्यात घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पतीचा मृत्यू झाल्यानंतर वैशालीने सकाळची नियमित कामे उरकली. त्यानंतर तिने आपल्या वडिलांना आणि भावाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पुढे भावाला आणि लहान मुलीला सोबत घेऊन ती गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाली. तेथे पोलिसांसमोर पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
या माहितीच्या आधारे गावभाग पोलिसांचे पथक तातडीने त्रिशूल चौकातील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सागर बुरसे यांच्या मृतदेहाची तपासणी केली आणि संशयित वैशालीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून, प्रकरणाचा पुढील तपास गावभाग पोलीस करत आहेत.
हत्येची बातमी समजताच सागर यांच्या आई, बहिणीसह अन्य नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर यांच्या मृत्यूने नातेवाईकांनी आक्रोश केला, तर या घटनेची माहिती पसरताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.


